• आजपासून रिपाइंची नागपुरात राष्ट्रीय परिषद

    नागपूर, २ ऑक्टोबर
    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर उद्या ३ ऑक्टोबरपासून नागपुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची राष्ट्रीय परिषद व रिपब्लिकन महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी उपस्थित राहणार आहेत. भीमशक्ती-शिवशक्तीच्या विभागीय मेळाव्यानंतर उद्या दुसऱ्यांदा भाजप-सेना आणि रिपाइंचे नेते एका व्यासपीठावर येणार आहेत.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ ला नागपुरात झाली होती. त्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम रिपाइंने आयोजित केला असून तो दोन दिवस चालणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी ११.३० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात रिपब्लिकन महोत्सवाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ, रिपाइं नेते व माजी मंत्री प्रीतमकुमार शेगावकर, आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह रिपाइं, भाजप आणि सेनेचे स्थानिक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
    आगामी विधानसभा आणि पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिवशक्ती-भीमशक्ती युती करण्यात आली आहे. नागपुरात गुरुवारी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या वर्धापन दिनाच्या पाश्र्वभूमीवर हा कार्यक्रम होत असून रिपाइंच्या व्यासपीठावर भाजप आणि सेनेचे नेते उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
    उद्या सायंकाळी ५.३० वाजता ‘रिपब्लिकन पक्षाचा कार्यक्रम व पुढील वाटचाल’ या विषयावर डॉ. कृष्णा किरवले(विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ४ ऑक्टोबरला सकाळी ११.३० वाजता साई सभागृहात आठवले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परिषद होणार असून त्यात देशभरातील पाचशे प्रतिनिधी सहभागी होतील, असे पक्षाचे सरचिटणीस भूपेश थुलकर यांनी कळवले आहे.   
  • You might also like

    No comments:

    Post a Comment